शौकिनांनीपाठ फिरवल्याने पन्नास टक्क्यांनी विक्री घटली

शौकिनांनीपाठ फिरवल्याने पन्नास टक्क्यांनी विक्री घटली

पतंगप्रेमींनी पाठ फिरवल्याने विक्रेते प्रतीक्षेत व्यवसायात ५० टक्क्यांची घट वाशी, ता. ११ (बातमीदार) ः मकार संक्रांत म्हणजे पतंगप्रेमींसाठी पर्वणीच; मात्र तरुणाईच्या बदललेल्‍या आवडी-निवडी, महागाई आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी पतंग उडवण्याविरोधात करण्यात येणारी जनजागृती, ऑनलार्इन गेम्स आदी कारणांमुळे यंदा पतंग-मांजावरच संक्रांत आली आहे. एकेकाळी दुकाने संक्रांतीच्या आठवडाभर आधीपासून पतंगप्रेमींच्या गर्दीने दुकाने फुलून जायची; मात्र यंदा पतंग-मांजाच्या विक्रीमध्ये तब्बल ५० टक्‍क्‍यांनी घट झाली असून विक्रेते चिंतेत पडले आहेत. गेल्‍या काही वर्षांमध्ये संगणकाच्या महाजालात अडकलेल्या तरुणाईला शाळा-मोबाईलचीही भुरळ पडली आहे. तासन् तास संगणक किंवा मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झालेल्या तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. शिवाय पतंग उडवण्यातही तरुणांना रस राहिलेला नाही. गेल्‍या पाच वर्षांमध्ये पतंग-मांजाच्या विक्रीवर मंदीचे सावट आले आहे. यंदा जवळपास ५० टक्क्यांनी विक्री घटल्‍याचे विक्रेते अबुगफर नेमन यांनी सांगितले. पूर्वी ऑक्टोबर महिना उजाडताच आकाशात पतंग भिरभरू लागायचे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बहुतांश आबालवृद्ध मैदानात, गच्चीवर पतंग उडवताना दिसायचे; मात्र यंदा विक्रेते पतंगप्रेमींच्या प्रतीक्षेत आहेत. विक्रेत्यांनी हार न मानता अनेक वेगवेगळ्या आकाराचे फॅन्सी पतंग, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू, लिटिल सिंगम, बटरफ्लाय, विमानाच्या आकाराचे पतंग; तर नायलॉन मांजाला ‘पर्याय’ म्हणून ‘बारा तार’ मांजा बाजारात आणत पतंगप्रेमींना भुरळ पाडण्याचा प्रयत्‍न केला आहे. याबाबत पतंगविक्रेत्यांशी संवाद साधला असता गतवर्षीपेक्षा यंदा व्यवसायात अधिक मंदी असल्‍याचे सांगण्यात आले. पतंगनिर्मितीच्या कामात कौशल्याची आवश्यकता आहे. एकेकाळी पतंग बनवणारे कसबी कारगीर होते, परंतु काळाच्या ओघात कारागिरांची संख्या घटल्याने मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला. आजघडीला पतंग बनवणाऱ्या कारागिराला दिवसभरासाठी ३०० ते ४०० रुपये दिले जातात; मात्र अन्य ठिकाणी काम केल्यावर ५०० ते ६०० रुपये रोजंदारी मिळत असल्याने कारागीर पतंगनिर्मितीचे काम करायला तयार होत नाहीत. एके काळी ५० पैशांना पतंग मिळायचा, आता तोच पतंग १५-२० रुपयांना मिळू लागला आहे. - अबुगफर नेमन, विक्रेता पतंगाचा वापर उडवण्याबरोबरच आता डेकोरेशनसाठीही होऊ लागला आहे. मकर संक्रांत आल्यामुळे ऑफिस तसेच घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी पतंगाचा वापर केला जात आहे. त्यासाठी छोटे पतंग बाजरात आले आहेत. १०० पतंग ३५० रुपयांना मिळत आहेत. उडणाऱ्या पतंगापेक्षा यंदा डेकोरेशनसाठी असणाऱ्या पतंगांना जास्त मागणी आहे. - रामजी गौडा, विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com