संक्रांतीत आवर्जून पसंती
काळा रंग मानाचा
शुभांगी पाटील
नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असं म्हणत आपांपसातील राग-रुसवा, वाद विसरून आनंदात उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीचे वेगळेपण म्हणजे एरवी अशुभ मानला जाणाऱ्या काळा रंगाचे कपडे या दिवशी बहुतेकांकडून परिधान केले जातात.
नववधू किंवा घरातील लहान मुलांची पहिली संक्रांत आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. या दिवशी लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तसेच स्त्रिया आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतात. इरकल, चंद्रकला, खणाची, काठपदर, सिल्कबरोबरच आता फॅन्सी साड्यांचाही ट्रेण्ड वाढला आहे.
मकरसंक्रात हा सण केवळ गृहिणींपुरताच मर्यादित राहिला नसून कार्पोरेट सेक्टर, खासगी संस्थांमध्येही उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रियाबरोबरच मुली- महाविद्यालयीन तरुणीही या सणानिमित् तकाळ्या रंगाच्या साड्या नेसतात. निव्वळ प्लेन काळ्या रंगाची साडी नेण्याबरोबरच आता थोडा हटके लूकच्या साड्या नेसण्याकडेही तरुणींचा कल वाढला आहे. काळ्या लीननच्या साड्या, काळ्या रंगाच्या साड्यांना सिल्ककाठ, काळ्या रंगाच्या फेस प्रिंटेट साड्यांना खणाचे जोड लावून अनोख्या रंगसंगतीच्या हटके साड्यांना पसंती मिळत आहे. तर काही काळ्या साड्यांना दुपट्टा किंवा पोताचे कापड लावून नवा ट्रेंडी लूक देण्यात आला आहे.
यंदा खनाच्या साड्या बाजारात भाव खात असून त्यांचे दरही सर्वसामान्य महिलांना परवडतील, असे असल्याने महिलांच्या मनाला चांगल्याच भावत आहेत. सिल्कमध्येही खणाच्या साड्या आल्या असून अगदी ३००- ५००० रुपयांपासून उपलब्ध असून खपही भरपूर असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तर काहींनी बांधणीच्या काळ्या साड्यांची खास मकरसंक्रांतीसाठी ऑर्डर दिली आहे.
चौकट
जानेवारीत थंडीचा जोर वाढलेला असतो. काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेत शरीर उबदार ठेवतात. म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या पहिल्या सणाला म्हणजेच मकरसंक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक कुटुंबात नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी भेट दिली जाते. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. काही कुटुंबात काळे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते, मात्र संक्रांतीला अपवाद असल्याने अनेकजण आपली हौस भागवतात.