मालवणीतील रस्ता मोकळा होणार
सहा इंची जलवाहिनीला मंजुरी
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक तीन येथील रस्ता लवकरच मोकळा होणार आहे. सहा इंची जलवाहिनी मंजूर झाल्याने शेकडो जलवाहिन्यांमुळे नाहीसा झालेला रस्ता आता चालण्याजोगा होणार आहे.
हा एकमेव रस्ता असल्याने रशीद खान कम्पाऊंड, पटेल कम्पाऊंड, बाबू भाई चाळ, एकता चाळ, पंजाबी चाळ, गुजराती चाळ, झोडीएक सोसायटी, शोभावती कॉटेज, गोन्साल्विस कम्पाऊंड, रोझरिओ कॉलनी, तसेच अली तलाव परिसरापर्यंत जवळजवळ ५ ते ६ हजार लोकवस्तीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सहा इंची जलवाहिनीमुळे सव्वाशे-दीडशे जलवाहिन्या हटवण्यात येणार असून त्या ठिकाणी खाली असलेले गटारही दुरुस्त करण्यात येणार आहे.
स्थानिकांनी मुंबईचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांना एक वर्षाआधी पत्र देऊन मागणी केली होती. तसेच १६ मार्च २०२१ ला अस्लम शेख यांनी पालिकेला पत्र लिहून या ठिकाणी सहा इंची जलवाहिनी बसवण्यास सांगितले होते. ७ जानेवारी रोजी पालिका पी उत्तर विभागातील जलखात्याचे कनिष्ठ अभियंता व त्यांच्यासोबत काही अधिकारी यांनी जागेची पाहणी व मोजमाप करत दोन-तीन दिवसांत काम सुरू होणार असे सांगितल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
...