ठाणे जिल्ह्यात दीड लाख नवे मतदार
जिल्ह्यातील मतदार संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ ः मतदानाचा हक्क हा सर्वात श्रेष्ठ हक्क मानला जातो. मात्र, तरीदेखील अनेक नागरिकांची नावे मतदार याद्यांमध्ये नाहीत. १८ वर्षे पूर्ण केलेले तरुण-तरुणीदेखील मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यास टाळाटाळ करतात. याची प्रशासकीय पातळीवर दखल घेत मागील अनेक दिवसांपासून मतदार यादी नाव नोंदविण्याविषयी जागृती करून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला यश आले असून ठाणे जिल्ह्यात नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या तब्बल १ लाख ७० हजार ६९९ एवढी आहे. जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४१ वरून ८४३ झाले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्यात एकूण मतदार ६४ लाख ६६ हजार ७९८ असून त्यात महिला मतदारांची संख्या २९ लाख ५७ हजार १४, तर पुरुष मतदारांची संख्या ३५ लाख ९ हजार ४२ आहे. इतर मतदारांची संख्या ७४२ आहे, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. १ जानेवारी २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले ८ लाख ३५ हजार ५०८ इतके मतदार होते.
७४२ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांच्याशी संलग्न असलेल्या तृतीयपंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेण्यात आली. त्याद्वारे वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७४२ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे.
नवे मतदार - १ लाख ७० हजार ६९९
महिला - ८१ हजार ६७६
पुरुष - ८८ हजार ७८४
इतर मतदार - २३९