पतंग उडवू चला
कार्टून, तिरंगा, पक्ष्यांचे विविध आकार लक्षवेधी
दीपक घरत
मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा असल्याने बाजारपेठेत विविध रंगातील आणि आकारातील पतंग-मांजा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पनवेलमधील मिरची गल्लीत पतंग विक्रीची मोठी बाजारापेठ आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकजण संक्रांतीला पतंग उडविण्याचा आनंद घेत असतो. दुकांनामधील फिरकीवर चमकणारे लाल, गुलाबी, निळा, पिवळा असे विविध रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मांजामध्ये अनेक प्रकार आहेत. साधारणतः एका चकरीमध्ये ५ ते ६ रिळ मांजा असून २५० ते ३०० रुपयाला त्याची विक्री केली जाते. विविध आकारातील रंगबेरंगी पतंग १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत. कार्टूनची चित्र असलेल्या पतंगांना लहानग्यांकडून मोठी मागणी आहे. कार्टूनसोबत तिरंग्याचे फोटो असलेले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले पतंगाला पसंती मिळत आहे.
चौथी पिढी पतंग व्यवसायात
पनवेलमधील मिरची गल्लीत होलसेल दरात पतंग विक्री करणारे मुस्तफा पनवेलवाला यांची चौथी पिढी पतंग विक्रीच्या व्यवसायात आहे. मुस्तफा यांचा मुलगा इब्राहिम सध्या गुजरातवरून पतंग आणतो आणि ते होलसेल दरात विकण्याचा व्यवसाय करत आहेत.
४०० ते ८०० रुपयांला विक्री
कामोठे सेक्टर ९ मध्ये श्रीकांत रेपाळ पतंग बनवून विक्रीचा व्यवसाय करतात. गतवर्षी त्यांनी राफेल या लढाउ विमानाच्या आकारातील ६ फूट उंचीचा पतंग विक्रीला ठेवले होते. यंदा रेपाळ यांनी फुलपाखरू, जेट प्लेन, पक्ष्याच्या आकारातील पतंग बनवायला सुरवात केली आहे. सोमवारपासून रेपाळ चालवत असलेल्या स्तुतिशा गृह उद्योगाच्या केंद्रात पाच ते सहा फुटाचे हे पतंग ४०० ते ८०० रुपयांला विक्रीस आहेत.