ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचे वाजतात बारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचे वाजतात बारा
ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचे वाजतात बारा

ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचे वाजतात बारा

sakal_logo
By
ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचे वाजतात बारा विद्यार्थ्यांचे नुकसान; उपाययोजना राबवण्याचे पालकांचे मत देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा पोलादपूर, ता. ८ : कोरोनाची तिसरी लाट आल्याने राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यात जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद केल्या असून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, पोलादपूरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने सरकारने योग्य त्या उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे मत काही पालक व्यक्त करत आहेत. राज्यात तसेच अनेक तालुक्यांतही शिक्षक व विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शाळेची वाट बंद होऊन ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने पालकांसमोर पेच निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षण म्हटल्यावर विद्यार्थ्यांना मोबाईल, नेटचे रिचार्ज करून द्यावे लागणार आहे. अगोदरच पालक मोबाईल, नेटच्या रिचार्जला कंटाळले आहेत. दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी त्यांना नवीन स्क्रीन टच मोबाईल घेऊन दिले. मात्र, काही ठिकाणी असे निदर्शनास आले की ऑनलाईन शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी मोबाईलवर यु-ट्युबवर कार्टून बघण्यात मग्न राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील वेळ वाढू लागला आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे त्यांच्या आरोग्यावर होत आहे. सतत मोबाईल, संगणक वापरल्याने लहान मुलांना डोकेदुखीचा आजार जडला आहे. डोकेदुखी वाढत असल्याने मुलांमध्ये एकाग्रता राहिली नाही. तासनतास मोबाईलवर असल्याने मुलांच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून ऑफलाईन शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, पुन्हा एकदा ओमिक्रॉन आणि कोरोनाने डोकेवर काढल्यामुळे शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा मोबाईलवरील स्क्रीन टाईम वाढणार का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. याशिवाय दुर्गम भागात मोबाईलला नेटवर्क नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. स्क्रीनटच मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन शिक्षण हे ग्रामीण भागात न परवडणारे आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने सरकारने योग्य उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले आहे. लसीकरणाला वेग पोलादपूर तालुक्यातील लसीकरण वेगाने सुरू आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील यशवंत इंग्लिश स्कूल आणि वरदायिनी महाविद्यालयात कापडे या ठिकाणी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. यापूर्वी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरणाचा पहिला डोस ९० टक्के, तर दुसरा डोस ७० ते ७५ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी तीन व्यक्तींचे गृहविलगीकरण केले असून दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top