ऑक्सिजन प्लान्टचे लोकार्पण
दिवसाला २.२४ मॅट्रिक टनची निर्मिती
वाशी, ता. ८ ः वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोविड केयर सेंटर येथे उभारलेल्या ऑक्सिजन प्लान्टचे शुक्रवारी आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, निशांत भगत, महामंत्री नीलेश म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला होता. नवी मुंबईतील नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, याकरिता ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता आमदार निधीतून एक कोटींची तरतूद केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेनेही त्वरित कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली याबद्दल पालिका आयुक्त अभिजित बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांचे मंदा म्हात्रे यांनी आभार मानले.
वाशी ऑक्सिजन प्लांटची क्षमता १२०० एलपीएम असून दिवसाला २२५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर म्हणजेच दिवसाला २.२४ मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. तसेच दिवसाला सुमारे १५० नागरिकांना लाभ होणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका