अभिनेत्री अश्विनी महांगडे झाली भावुक
एखाद्या कलाकारासाठी एखादी व्यक्तिरेखा साकारणं म्हणजे परकाया प्रवेशच असतो. ती व्यक्तिरेखा ते फक्त साकारीत नाहीत तर जगतातही. असाच काहीसा अनुभव
सांगितला आहे अनघा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने. अश्विनी ‘आई कुठे काय करते‘ या स्टार प्रवाहवरील मालिकेत अनघाची भूमिका साकारीत आहे.
आता अनघा आणि अभिषेक यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. गेले बरेच दिवस प्रेक्षकांना त्यांच्या लग्नसोहळ्याबाबत उत्सुकता लागलेली होती; परंतु या मालिकेतला
लग्नाचा प्रसंग साकारताना अश्विनी महांगडे भावुक झाली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या वडिलांना गमावलं. योगायोगाची बाब अशी की, अश्विनीच्या वडिलांचं आणि
मालिकेतील वडिलांचं नावही प्रदीप आहे. त्यामुळे प्रदीप हे नाव जेव्हा जेव्हा कानावर पडतं तेव्हा मला बाबा आठवतात असं अश्विनी म्हणाली. अनघा ही व्यक्तिरेखा मी फक्त
साकारत नाहीय तर ती जगते आहे. त्यामुळे अनघाचं आयुष्य सुखी व्हावं अशी इच्छा माझी सुद्धा होती. घटस्फोटित स्त्रियांकडे पाहाण्याचा समाजाचा वेगळा दृष्टिकोन असतो.
पण त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. आयुष्यातला एखादा निर्णय चुकला म्हणून संपूर्ण आयुष्यच चुकीचं ठरत नाही. त्यामुळे अनघाचं लग्न समाजातील अनेक अनघांसाठी
आशेचा नवा किरण असेल.