मुंबई पोलिसांचा `खाकी स्टुडिओ`!
रोहिणी गोसावी
गुन्ह्यांचा तपास करणे, नागरिकांना सुरक्षा पुरवणे, रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करणे एवढेच पोलिसांचे काम आहे, अशी अनेकांची धारणा असते. पण गेल्या वर्षी मुंबई पोलिसांचे काही सांगीतिक चित्रफित (म्युझिकल व्हिडोओ) पोलिसांच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आणि वाऱ्याच्या वेगाने ती समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पोलिसांनी वाजवलेले `बेला चाव` गाणे असेल किंवा जेम्स बाँडचे गाणे किंवा बॉलीवूडमधील `मेरे सपनों की राणी कब आयेगी तू` हे गाणे असेल, पोलिसांचा हा `खाकी स्टुडिओ` नेटकऱ्यांच्या भाषेत इंटरनेट सेन्सेशन बनला आणि पोलिस हे देखील करू शकतात, हे नागरिकांना नव्याने समजले.
-------------
मुंबई पोलिसांच्या अंतर्गत येणारे हे पोलिस बँड पथक महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व करते. राज्यभरातील सरकारी कार्यक्रमांत पोलिसांचे हे हक्काचे बँड पथक महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व करते. पण या पोलिस बँडचे नेतृत्वही तसाच धडाडीचा आणि जणू संगीतच त्याचे आयुष्य असलेला एक अधिकारी करतो, त्यांचे नाव आहे पोलिस निरीक्षक संजय कल्याणी. संजय कल्याणी हे सध्या या पोलिस बँड आणि खाकी स्टुडिओचे प्रभारी आहेत. ते १९९७ ला भारतीय नौदलाच्या बँडमध्ये भरती झाले होते. नौदलाच्या त्यांच्या कार्यकाळात २००३ मध्ये त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन संगीतिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये ते नौदलातील त्यांचा कार्यकाळ संपवून निवृत्त झाले.
संजय कल्याणी हे २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या बँड पथकात सहभागी झाले. तेव्हापासून संजय कल्याणी हे त्यांची जबाबदारी अगदी उत्साहाने पार पाडत आहेत. १९३६ मध्ये इंग्रजांच्या काळात या मुंबई पोलिस बॅंडची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत यात अनेक बदल झाले. अनेक अधिकारी येऊन गेले, माणसे बदलली, फक्त बदलली नाहीत ती वाद्ये. या पोलिस बँडची सुरुवातही पाश्चिमात्य वाद्य वाजवण्यापासून झाली, ती परंपरा अजूनही सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या या बँडमध्ये अजूनही पाश्चिमात्य वाद्यांवरच संगीताची रचना केली जाते.
पोलिस बँड फक्त जनतेच्याच नाही तर इतर राज्यांतल्या पोलिसांशी जोडण्याचा एक दुवा असल्याचे संजय कल्याणी यांनी सांगितले.
जेव्हा गरज असते, तेव्हा या बँडमधील अंमलदारांनाही पोलिसांची `ड्युटी` करावी लागते. कोरोना काळातही या सर्वांनी गरज असेल तिथे जाऊन ड्युटी केली आहे. सरकारी कार्यक्रम सोडूनही आपण काही वेगळे करू शकतो, या ध्येयाने इतर म्युझिक स्टुडिओसारखाच पोलिसांच्या `खाकी स्टुडिओ`चा जन्म झाला आणि नवनवीन संगीत प्रेक्षकांच्या भेटीला यायला लागले. आतापर्यंत या खाकी स्टुडिओने विविध १९ गाण्यांचे संगीत तयार केले आहे. आणि त्याला समाज माध्यमावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाश्चिमात्य वाद्य असले तरीही त्यांचा वापर करून खाकी स्टुडिओने आतापर्यंत आनेक भारतीय गाण्यांना वेगळ्या पद्धतीने सादर केले आहे.
----------
...अशी होते भरती
संजय कल्याणी यांच्या मते, ही वाद्य म्हणजे या बँडची संस्कृती आहे, ती आम्ही आजपर्यंत जपली आहे आणि इथून पुढेही ती जपली जाईल. या बँडमध्ये असलेला प्रत्येक अंमलदार हा संगीताचा अभ्यासक आणि संगीताबद्दल `पॅशन` असणारा आहे. तशाच व्यक्तींना बँडमध्ये नियुक्त केले जाते. पोलिस भरतीपेक्षा बँडची भरती वेगळी असते. सध्या बँडमध्ये जवळपास १३७ अंमलदार आहेत. जेव्हा यातील कुणी निवृत्त होते, तेव्हा भरतीद्वारे नवीन उमेदवार घेतले जातात. भरतीच्या वेळी त्यांना संगीताचे किमान ज्ञान आणि किमान एक तरी वाद्य वाजवता यायला हवे, अशी अट असते. त्यांना नंतर पोलिस प्रशिक्षणही दिले जाते.
नकारात्मकता कमी व्हायला लागते
बँडमध्ये काही कलाकारांची दुसरी पिढी आहे. अनेक कलाकारांचे वडील याच बँडमध्ये काम करायचे. झमिर शेख हेही असेच या बँडचे एक कलाकार आहेत. त्यांच्या वडिलांनी जवळपास ४० वर्षे पोलिस बँडमध्ये काम केले. त्यांच्याकडून झमिर यांना संगीताची गोडी लागली. `बँडमध्ये काम मिळत असेल तरच पोलिसात जायचे, असे ठरवूनच मी येथे भरती झालो,` असे झमिर शेख सांगतात. पोलिस बँड हा पोलिस आणि जनतेमधील एक दुवा म्हणून काम करतो, असे त्यांना वाटतं. अनेकांच्या मनात पोलिसांबद्दल नकारात्मक प्रतिमा असते, अनेक जण पोलिसांना कठोर आणि शिक्षा करणारा कडक शिस्तीचा शिक्षक वाटत असतो. त्यामुळे जेव्हा आमचे संगीत नागरिकांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी व्हायला लागते, असा अनुभव आल्याचेही झमिर शेख सांगतात.