वाहतूक पोलिसांविरोधातील
आरोपांची चौकशी सुरू
राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई, ता. ८ : नियमबाह्य पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांना उचलून नेताना वाहतूक पोलिस चालकांकडून गैरप्रकारे पैसे उकळत असल्याच्या आरोपांबाबत चौकशी सुरू केल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच याचिकेत ठाणे आणि नवी मुंबई पोलिस आयुक्तांना प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
नारपोली, माणकोली, कळवा, खारेगाव, मुंब्रा टोलनाका, कल्याण फाटा, कापूरबावडी, माजिवडा, पनवेल, महापे, कळंबोली आणि तळोजा येथे टोईंग शुल्काच्या वसुलीखाली ट्रकचालकांकडून जादा पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप याचिकेत केला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक अशा विविध राज्यांतून येथे वाहनांची ये-जा होत असते. त्यांच्याकडून संरक्षण शुल्क या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील टोके यांनी ॲड. प्रदीप हावनूर यांच्यामार्फत याचिका केली आहे.
...
‘दोषींवर कारवाई करू’
शुक्रवारी न्या अमजद सय्यद आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत उपस्थित आरोपांची दखल सरकारने घेतली असून चौकशी सुरू केली आहे. यात दोषी आढळलेल्या पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशी हमी सरकारी वकील ए. आर. पाटील यांनी दिली. राज्य सरकारने तीन आठवड्यांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे; ठाणे, नवी मुंबई पोलिस आयुक्तांना प्रतिवादी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकेवर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.