कायमस्वरूपी पोलिस महासंचालक नियुक्त करा
उच्च न्यायालयात याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी आहे.
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, आता पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली आहे.
पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते. ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यातील अंतिम तीन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे, असे याचिकेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या तीन अधिकाऱ्यांमधून एकाची या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.
सध्या असलेले हंगामी महासंचालक पांडे यांना कायम करण्यासाठीही एक प्रक्रिया आहे, असा दावाही यात करण्यात आला आहे. याचिकेवर लवकरच न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
...