वालधुनीच्या संवर्धनासाठी यंत्रणा एकवटल्या
प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी बैठक
अंबरनाथ, ता. ८ (बातमीदार)ः वालधुनी नदीमधील प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका प्रशासन, एमआयडीसी अशा सरकारी यंत्रणा एकवटल्या आहेत. या मुद्द्यावर नुकतीच या सरकारी यंत्रणांची बैठक नगरपालिकेमध्ये पार पडली.
वालधुनी नदी रासायनिक प्रदूषणामुळे प्रदूषित झाली आहे. याच अनुषंगाने अंबरनाथ पालिकेत झालेल्या शासकीय यंत्रणांच्या बैठकीत नदी संवर्धनासाठी उपाययोजना आखण्यावर चर्चा करण्यात आली. अंबरनाथ शहराजवळून उगम पावणारी वालधुनी नदी अंबरनाथ एमआयडीसी आणि पुढे अंबरनाथ शहरातून उल्हासनगर शहरात वाहत जाते; मात्र अंबरनाथ एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वनशक्ती संस्थेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह एमआयडीसीला दंड ठोठावला होता. यातून या नदीचे पुनरुज्जीवीकरण केले जाणार होते; मात्र त्यानंतरही नदीत रसायने सोडण्याचे प्रकार सुरूच राहिले. या सगळ्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कंपन्यांवर काहीही कारवाई करत नव्हते. त्यामुळे वालधुनी नदीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी अंबरनाथ पालिकेत शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. या बैठकीत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे, एमआयडीसीचे अधिकारी, अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.