भिवंडी पालिकेत नागरिकांना प्रवेशबंदी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा आदेश
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भिवंडी पालिकेत सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढले. तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची पालिकेत एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहील. या दरम्यान, नागरिकांना ई-मेलद्वारे तक्रारी दाखल कराव्या लागणार आहेत. या कालावधीत पदाधिकारी, नियंत्रण अधिकारी यांच्या दालनात अत्यंत आवश्यक असल्यासच बैठक आयोजित करण्यात यावी, तसेच बैठकींना खासगी व्यक्तींना निमंत्रित करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही नागरिकाला, ठेकेदाराला किंवा अन्य व्यक्तींना पालिकेत प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. महापालिका कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, कर्मचारी यांच्यावर महापालिका प्रशासन पथकामार्फत ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.