३२० किलो टाकाऊ प्लास्टिकपासून बाकडे, कुंड्या...
पालिका के पूर्व प्रभाग कार्यालयात कायमस्वरूपी प्रदर्शन
मुंबई महापालिकेच्या के पूर्व प्रभाग कार्यालयात सुमारे ३२० किलो टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या उपयुक्त व टिकाऊ वस्तूंचे `बॉटल्स फॉर चेंज` हे कायमस्वरूपी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बागेतील बसण्याची बाकडी, शाळेतील बेंच, झाडांच्या कुंड्या, फ्लॉवर पॉट, टी-शर्ट, पिशव्या, फ्लोअर टाईल्स आणि कचऱ्याच्या बादल्या अशा प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनविलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
‘बिस्लेरी ट्रस्ट’ तर्फे स्वच्छ व हरित पर्यावरणासाठी असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच अंतर्गत पालिका कार्यालयात ट्रस्टतर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा, याबाबत ‘बॉटल्स फॉर चेंज’ या सीएसआर विभागाच्या संचालक अंजना घोष यांनी उद्घाटनप्रसंगी माहिती दिली. प्लास्टिकची टाकाऊ वस्तू स्वच्छ करून वेगळ्या पिशवीत ठेऊन कचरावेचकाकडे देणे एवढेच काम नागरिकांना करायचे आहे. हे कचरावेचक नंतर ‘बॉटल फॉर चेंज व्हॅन’कडे या पिशव्या देतील किंवा भंगार व्यावसायिकाला त्या विकतील. भंगार व्यावसायिक हे प्लास्टिक रिसायकल करणाऱ्याला विकतात. तेथे त्यावर प्रक्रिया करून त्याचे शीट्स व दाणे बनवतात. त्यापासून वरील वस्तू तयार होतात; तर ‘पेट बॉटल्स’ ठेचून त्यातून ‘फायबर फ्लेक्स’ तयार केले जातात आणि त्यापासून टी-शर्ट्स, बॅग्ज आदी वस्तू बनविल्या जातात.
प्रदर्शनाला भेट देणारे नागरिकही ‘बॉटल फॉर चेंज’ या कार्यक्रमासाठी नोंदणी करू शकणार आहेत. बिस्लेरी ट्रस्टतर्फे या व्यतिरिक्त ‘नयी उम्मीद’ प्रकल्पाच्या माध्यमातून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ आणि ‘ओझोन फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून ‘ओझोन थेरपी’ असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. बॉटल फॉर चेंज हा उपक्रम सहा लाख नागरिक, तसेच दीड हजार ५०० कंपन्या, हॉटेल, शाळा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामार्फत आतापर्यंत साडेसहा हजार टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात आला आहे.