‘बुलीबाई ॲप’प्रकरण
नीरज बिष्णोईला ताब्यात घेण्यासाठी
मुंबई पोलिसांची तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः ‘बुलीबाई ॲप’प्रकरणी अटकेत असलेला नीरज बिष्णोई याला ताब्यात घेण्यासाठीची तयारी मुंबई पोलिस करीत आहेत. नीरज बिष्णोईला ६ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी आसाम येथून अटक केली आहे आणि सध्या तो दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.
‘बुलीबाई ॲप’प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. विशाल कुमार झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी चुकीच्या लोकांना अटक केली आहे; या प्रकरणात त्यांचा काहीही हात नाही, त्यांचे ट्विटर अकाऊंटस् मी चालवत होतो, असे एका ‘ट्विटर हँडल’वरून जाहीर केले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणाची एक तक्रार दिल्ली पोलिसांकडेही करण्यात आली होती.
नीरजची चौकशी
निरंजनने एका गेमच्या व्यक्तिरेखेवरून giyou नावाचे अनेक ट्विटर हँडल तयार केले होते. त्याच्या चौकशीतून @giyou२००२, @giyou००७, @giyou८४, @giyou९४, @giyou४४ असे ट्विटर हँडल नीरज चालवत असल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले आहे. यापैकी giyou२००२ या ट्विटर हँडलबद्दल दिल्लीत दाखल झालेल्या तक्रारीत उल्लेख आहे. याच ट्विटर हँडलवरून तक्रारदार महिलेवर बोली लावण्यात आल्याची माहिती नीरजने दिल्ली पोलिसांना दिली आहे. Giyou४४, हे ट्विटर हँडल त्याने ३ जानेवारीला तयार केले होते; ज्यावरून त्याने उर्वरित तीन आरोपी निर्दोष असल्याचे ट्विट केले होते. या अकाऊंटचे लोकेशन नेपाळमध्ये दाखवण्यात आले होते.
@giyou००७ हे ट्विटर हँडल सहा महिन्यांपूर्वी बनवण्यात आले होते. जेव्हा ‘सुली डील अॅप’ चर्चेत आले. त्या वेळी नीरजने एक खोटे खाते तयार केले होते. ज्यावरून तो महिला पत्रकार असल्याचे भासवून तपास यंत्रणेशी बोलत होता. त्याने तेव्हा काही पत्रकारांशी संपर्क करून त्यांची दिशाभूल करीत होता, असे दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिस पुढे आणखी तपास करीत आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.