विषाणूजन्य आजारांवरील
औषधांच्या मागणीत वाढ
पुढील आठवड्यात तुटवड्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वातावरण बदलामुळे वाढलेल्या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्दी, खोकला, नाक चोंदणे आदी तक्रारी वाढल्या असून त्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या मागणीत तब्बल २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. औषधांची मागणी अशीच वाढत राहिल्यास आठवडाभरात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईत वातावरण बदलाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, गळ्यात खवखव अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोकेवर काढल्याने प्रकरणे वाढू लागली आहेत. विषाणूजन्य आजार आणि कोरोनाची लक्षणे सारखीच असल्याने लोकांकडून सर्दी, ताप, खोकल्याची औषध खरेदी वाढली आहे. त्यातही नेसल स्प्रे, ॲझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन आणि व्हिटॅमिन सी आदी औषधांच्या मागणीत २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या गोष्टींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डरचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी व्यक्त केली आहे.