राज्यात ओमिक्रॉनबाधितांची संख्या एक हजार पार
दिवसभरात नव्या १३३ रुग्णांची भर; चिंता वाढली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यात ओमिक्रॉन बाधितांचा आकडा तब्बल एक हजारांवर पोहोचला असून शनिवारी दिवसभरात राज्यात १३३ नव्या ओमिक्रॉन बाधितांची भर पडली आहे. शनिवारी नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी १३० रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ३ गुजरात राज्याने कळवले आहेत. त्यात पुण्यात ११८, पिंपरी-चिंचवडमध्ये ८, पुणे ग्रामीणमध्ये ३, वसई-विरारमध्ये २ आणि अहमदनगर व मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण १ हजार ९ ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. त्यात २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. तर ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. याशिवाय ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ४३९ रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत ३ हजार ७६ नमुने जनुकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील
एकूण प्रवासी आरटी-पीसीआर बाधित
२४९४०१ ६९०८६ ९००