बूस्टर डोसचा श्रीगणेशा
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, सहव्याधीग्रस्तांना १० जानेवारीपासून लस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर सोमवारपासून (ता. १०) आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या बूस्टर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील सर्व सरकारी, महानगरपालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी तसेच थेट येऊन नोंदणी करून लसीकरण करून घेता येईल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरा डोस कधी झाला आहे हे पाहणे आवश्यक असेल. दुसरा डोस घेतलेल्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास ते १० जानेवारीपासून सुरू होणारा कोरोना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेण्यास पात्र असतील. ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक बूस्टर डोस घेण्यासाठी केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नसेल; मात्र अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
सरकारी आणि पालिका लसीकरण केंद्रांवर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य बूस्टर डोस देण्यात येईल; मात्र ज्या पात्र नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांसाठी केंद्र सरकारने पूर्वी घोषित केलेल्या किमतीमध्येच लसीकरण केले जाईल. लसीच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ओळखपत्र बंधनकारक!
सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन अॅपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी ‘नागरिक’ अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रात थेट येऊन (ऑनसार्इट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र/ ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
पात्रतेचे मापदंड-
१० एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी दुसरी मात्रा घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेले नागरिक हे १० जानेवारी २०२२ ला बूस्टर घेण्यासाठी पात्र असतील. दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास, हा निकष लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक मात्रा दिली जाणार आहे. तसेच संबंधित लाभार्थ्यांनी जर आधी कोविशिल्ड लस घेतली असेल तर त्यांना कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात येईल. ज्यांनी आधी कोवॅक्सिन लस घेतली असेल, त्यांना कोवॅक्सिन लसीची मात्रा देण्यात येईल.