राज्यात वेगाने रुग्णवाढ
दिवसभरात ४१ हजारहून अधिक कोरोनाबाधित, मृत्युदर नियंत्रणात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : राज्यात कोरोनाचा वेगाने संसर्ग होत असून आज दिवसभरात ४१ हजार ४३४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे पालिका, कल्याण-डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार पालिका आणि पुणे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ झाल्याचे दिसते. असे असले तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण शुक्रवारच्या तुलनेत कमी झाले असून शनिवारी १३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. जी की दिलासादायक बाब मानली जात आहे. राज्यात मृतांचा एकूण आकडा १,४१,६२७ इतका झाला आहे.
औरंगाबाद, अकोला, लातूर, नागपूर मंडळात शनिवारी एकाही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. ठाणे ६, नाशिक २, पुणे ३, औरंगाबाद २ अशी मृतांची नोंदवले गेले. राज्यात शनिवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ६८,७५,६५६ झाली आहे. राज्यातील मृत्युदर २.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १,७३,२३८ इतकी झाली आहे. आज ९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६५,५७,०८१ इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.३७ % एवढे झाले आहे. सध्या राज्यात ८,४५,०८९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ८५१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.