विद्यापीठ सुधारणा विधेयकाला भाजपचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः महाराष्ट्रातील विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. ठाण्यातील महाविद्यालयांबाहेर विधेयकातील धोक्यासंदर्भात विद्यार्थ्यांना जाणीव करून देणारे फलक लावण्यात येत आहेत. तसेच या विधेयकाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिस कॉल करण्यासाठी क्रमांक देण्यात आला आहे. भाजयुमोच्या कोकण युवती सहसंयोजिका वृषाली संजय वाघुले यांनी हा उपक्रम ठाण्यात हाती घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत घाईघाईने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मंजूर केले. या विधेयकामुळे विद्यापीठांच्या स्वायत्तता धोक्यात आली असल्याचा भाजयुमोसह सर्व शैक्षणिक संघटनांचा आरोप आहे. राजकीय पक्षाशी संबंधित कुलगुरूंच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे अवमूल्यन होण्याचा धोका आहे, असा आरोप भाजयुमोच्या कोकण सहसंयोजक वृषाली वाघुले यांनी केला; तर संबंधित विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी देऊ नये, यासाठी ठाण्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती ठाणे शहराध्यक्ष सारंग मेढेकर यांनी दिली. ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय आणि एनकेटी महाविद्यालयाबाहेर फलक लावण्यात आले आहेत.
प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांना ७७४५०५०१११ या क्रमांकावर मिस कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालयाबाहेर फलक लावल्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाही देण्यात आल्या. या वेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, सरचिटणीस अक्षय तिवरामकर उपस्थिती होते.