अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
‘सकाळ’च्या वृत्तानंतर पालिकेला जाग
कल्याण, ता. ९ (बातमीदार) ः कल्याण आरटीओ कार्यालयाबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथवर अनधिकृत टपऱ्या उभ्या होत्या. या टपऱ्यांमधून एजंट आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची लूट करत होते. या संदर्भात ‘सकाळ’ ने डिसेंबर महिन्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. या टपऱ्यांवर आरटीओ कारवाई करणार की पालिका, याविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर महापालिकेने या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करत या टपऱ्या पदपथावरून हटविल्या आहेत.
कल्याण आरटीओ कार्यालयामधील क्लार्क मनीष जाधव यांना ७ डिसेंबर रोजी ऑनलाईन फार्म भरणारा एजंट मच्छिंद्र केणे याने किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. याप्रकरणानंतर कल्याण आरटीओ कार्यालयाबाहेर पदपथावर बेकायदा उभारलेल्या एजंटच्या अनधिकृत टपऱ्यांबाबत ‘सकाळ’ ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल पालिकेने घेतली.
पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिका ब प्रभाग क्षेत्र कार्यालय सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी तेथील ४० हून अधिक टपरीधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. कारवाईच्या भितीपोटी अनेक टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या हटविल्या होत्या. मात्र, ज्यांनी टपऱ्या हटविल्या नव्हत्या त्या टपऱ्यांवर ब प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात धडक करवाई केली. या कारवाईने फुटपाथ मोकळे झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अनधिकृत टपऱ्या हटविल्या आहेत. आगामी काळात ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- चंद्रकांत जगताप, ब प्रभाग सहायक आयुक्त.