खारघरमधील १५६ सोसायटी सील
पाच दिवसात १५५० कोरोनाचे रुग्ण
खारघर, ता. ९ (बातमीदार) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पनवेल पालिका क्षेत्रात खारघर नोडढ हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता असून पाच दिवसात १५५० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल पालिका प्रशासनाने खारघरमधील १५६ सोसायट्या सील केल्या आहेत.
दोन वर्षात खारघरमध्ये कोरोना बाधितांचा आकडा २२ हजार ८५ असून पालिका क्षेत्रात सर्वात जास्त रुग्ण खारघरमध्ये आढळले आहे. आतापर्यंत २० हजार ६८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सद्यःस्थितीत १७५९ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे.
पाच दिवसांत खारघरमध्ये १५५० कोरोनाचे रुगांची नोंद झाली आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असलेली सोसायट्या सील करण्यात येत असून महापालिकेने १५६ सोसायट्या सील केल्या आहेत.
रुग्णावर घरीच उपचार
खारघरमध्ये १ ते ८ जानेवारी दरम्यान १८०२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून सद्यःस्थितीत १७५९ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे. या विषयी खारघरमधील पालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉ. विनायक देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, कोरोना केंद्रात अँटीजेन चाचणी करताना तसेच आरटीपीसीआर तपासणीत व्यक्तीला कोरोनाची लागण असल्याचे अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर उपचार करून घरीच विलगीकरण ठेवण्यात येत आहे. उपचार करताना काही अडचण आल्यास मोबाईलवर संपर्क साधला जातो. तर काही व्यक्तींना रुग्णालयात उपचार करावयाचे असल्यास कळंबोली येथील कोविड रुग्णालयात दाखल केले जाते.