मालमत्ता करात सवलतीसाठी महासभेत ठराव आणा : काँग्रेस
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य करदात्या नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत म्हणून मिरा-भाईंदर महापालिकेने मालमत्ता कर सवलतीचा ठराव महासभेत मंजूर करावा, तसेच मुंबई महापालिकेच्या धरतीवर मालमत्ता करमाफीसाठी पालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपने ठराव करून, राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी काँग्रेस
प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.
मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मुख्यमंत्र्यांनी मालमत्ता करमाफीची घोषणा केली आहे. ज्या पालिकांनी ठराव केले आहेत, अशा ठाणे, नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सदनिकाधारकांनाही करमाफीचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी केले असून, एमएमआर क्षेत्रातील नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही मालमत्ता कर माफ करण्याची मागणी हुसैन यांनी केली होती, अशी माहिती नागणे यांनी दिली. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सकारात्मक असल्यामुळे मिरा-भाईंदर पालिका प्रशासनाने व सत्ताधारी भाजपने महासभेत करमाफी/सवलत प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारकडे त्वरित पाठवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.