सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी
आशीष शेलार यांचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
मुंबई, ता. ९ :
राज्यातील शासकीय व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षक आणि शिक्षकेतरांनांही सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी विद्ममान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एक पत्र लिहून केली आहे.
राज्यात आपण शालेय शिक्षण मंत्री असताना ३१ जुलै २०१९ रोजी शिक्षक आणि शिक्षकेतरांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला होता. त्यासोबतच एका अभ्यास गटाची नियुक्तीही करण्यात आली होती. या अभ्यासगटाचा अंतिम अहवाल हा ८ मे २०२० रोजी देण्यात आला होता. या अहवालाच्या शिफारशींमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतरांना तीन ते चार लाभांची आश्वासित योजना देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षकांना या शिफारशी मान्य करून त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी करावा आणि संबंधित विभागाला तसे आदेश द्यावेत, अशी विनंती माजी शिक्षणमंत्री ॲड. शेलार यांनी केली आहे.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतरांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी विधानमंडळात अनेकदा मागणी लावून धरली होती. त्यानंतर हीच मागणी शिक्षक परिषद आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेनेही लावून धरली होती; तर दुसरीकडे परिषदेने यासाठी देशातील काही राज्यांमध्ये या योजनेच्या संदर्भात एक सर्वेक्षणही केले होते, अशी माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.