माथेरानमध्ये लॉकडाऊन नको
माजी नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
माथेरान, ता. ९ (बातमीदार) : दोन वेळा लॉकडाऊनचा तडाखा सहन केलेल्या माथेरानसाठी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे हे शहर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. पर्यटनाच्या सुरक्षेची खबरदारी घेऊ, असे निवेदन माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
माथेरानला दोन वर्षे कोरोनाचा त्रास सहन करावा लागला. गेल्या महिन्यात या शहराचे व्यवहार सुरळीत सुरू असताना कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा निर्बंध जाहीर करण्यात आले. ८ जानेवारीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रसारित केलेल्या नवीन नियमावलीनुसार स्थानिक पर्यटक स्थळांविषयी काही निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे पर्यटकांवर आधारित असलेल्या माथेरानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानचे पर्यटन सुरू ठेवावे यासाठी माथेरानच्या प्रेरणा सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
माथेरानचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा गटनेते प्रसाद सावंत यांनीही याबाबतचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. या वेळी कर्जतचे माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.