कोरोनाचा पोलिस दलात शिरकाव झाल्याने सतर्कता
भिवंडीत वाहतूक पोलिसांनी मास्क, सॅनिटायझर केले वाटप
भिवंडी, ता. ९ (बातमीदार) ः भिवंडी शहर व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना डेल्टाबरोबर ओमिक्रॉन व कोविड विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. जनतेची सेवा करणारे पोलिस विशेषतः वाहतूक विभागात काम करीत असलेल्या पोलिसांना कोविडची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होऊ लागली आहे. यासाठी भिवंडी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांच्या उपस्थितीत कोनगाव वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी पोलिस कर्मचारी व रिक्षाचालकांना जनजागृती करणारे पत्रक, मास्क व सॅनिटायझर वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर फलक लावून जनजागृती सुरू केली आहे.
भिवंडी शहर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बँक, महापालिका, पोलिस ठाणे आणि वाहतूक पोलिस प्रशासनासह सर्वच शासकीय कार्यालयांत बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस वर्धापनदिनाचे औचित्य साधून रिक्षाचालकांसह वाहतूक उपविभागात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना सुमारे २५०० हून अधिक मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. जनजागृती पत्रकांचे वाटप सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार, पोलिस निरीक्षक गिरीष गोडे यांच्या हस्ते करण्यात आले.