उन्हाळी भातलावणीस सुरुवात
मुँहु खुर्द लघु पाटबंधाऱ्याद्वारे पाणी
विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या भात पिकासोबत उन्हाळी हंगामातसुद्धा मुँहु खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, खांड, वाकडूपाडा गावात भात पिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत. सध्या या भागात भातलावणी सुरू आहे.
वाकडूपाडा येथील प्रयोगशील शेतकरी देवीदास बोरसे व इतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी आपल्या वर्षानुवर्षे भातलागवडीच्या अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने भात पिकाची लावणी सुरू केली आहे. भात पिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून भाताचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे.
मुँहु खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती करतात, परंतु या लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाद्वारे पाणी सोडले जात नसल्याने येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातशेती करणे सोडले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे पावसाळी भात पिकाचे मोठे नुकसान झाले. आता परत मोठ्या हिमतीने उन्हाळी भात पिकाची लागवड आम्ही केली आहे.
- देवीदास बोरसे, शेतकरी, वाकडुपाडा