भिवंडीत प्रियकराच्या मदतीने
पत्नीने केली पतीची हत्या
भिवंडी, ता. ९ ( बातमीदार ) ः अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला होता. मात्र, पोलिसांनी मृतदेहाचा अंगातील शर्टावरील टेलरच्या मार्कवरून मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या पत्नीसह प्रियकरास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सलाउद्दीन मोहम्मद युसूफ ( वय ४२, रा. विठ्ठल नगर, भिवंडी) असे मृत पतीचे नाव आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्याचा हद्दीत ४ जानेवारी रोजी खारबाव जंगलात एक व्यक्तीचा मृतदेह गळा चिरलेल्या व चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाच्या शर्टावरील आयान फॉर मेन्स टेलर्स हा मार्क आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी भिवंडीत या नावाने टेलर्स दुकानाचा शोध घेतला असता शहरातील बागे फिरदोस येथे सदर दुकान आढळून आले, त्यानी याबाबत दुकानदाराचा मदतीने शर्टाची व त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो मृतदेह सलाउद्दीन मोहम्मद युसूफ याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांकडून गोपणीय माहिती घेतली असता त्याच इमारतीमधील असजद अन्सारी ही व्यक्ती दफनविधीप्रसंगी नव्हती ही बाब समोर आली असता पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली त्याचा शोध घेत त्यास नारपोली परिसरातून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
...असा रचला कट
असजद अन्सारी (वय ३२) या विवाहित व्यक्तीचे सलाउद्दीनच्या ३८ वर्षीय पत्नीसोबत मागील सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. त्यामध्ये पतीचा अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराने मिळून कट रचला. सलाउद्दीनला लघवीचा त्रास होत असल्याने खारबाव येथील ग्रामीण भागात त्यावर गावठी औषध मिळते ते घेण्यासाठी त्यास पत्नीने गळ घातली व त्यासाठी दोघे गेले असता त्या ठिकाणी आधीच येऊन थांबलेल्या प्रियकराने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.