मुंबई बँकेत अपात्र उमेदवारांची नियुक्ती
ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ विश्वास उटगी यांचा आरोप
मुंबई, ता. ९ ः मुंबई बँकेत २०२० मध्ये झालेल्या नोकरभरतीत अनियमितता झाल्याचा आरोप ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केला आहे; तर उटगी यांचा आरोप बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी फेटाळला आहे.
नोकरभरती प्रक्रियेत बँक भरती धोरण, जाहिरातीतील भरतीचे निकष संचालक मंडळानेच बदलल्याचा आरोप होत आहे. मंजूर केलेल्या पदांहून अधिक उमेदवार, तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव महत्त्वाचा असताना केवळ सहकार क्षेत्रातील मर्यादित अनुभव परस्पर ग्राह्य धरून संचालकांनी नातलगांची नियुक्ती केल्याचेही उटगी यांनी आरोपात म्हटले आहे.
बँकेचे भरती धोरण संचालक मंडळाने निश्चित केल्यानंतर कर्मचारी संघटनेशी विचारविनिमय, सहकार विभागातील सक्षम अधिकाऱ्यांची आणि कामगार न्यायालयाची मान्यता घेणे जरुरी असते. जरुरी असल्यास धोरणात दुरुस्ती झाल्यास पुन्हा वरीलप्रमाणेच प्रक्रिया करावी लागते. या भरतीत धोरण बदलताना प्रशासनाची संमती घेतली नसल्याचा आरोप उटगी यांनी केला आहे.
भरतीसाठी नेमलेल्या एजन्सीने अर्जाची छाननी न करताच परीक्षा घेतल्या आणि मुलाखतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यामुळे अनेक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, बँकिंग क्षेत्रातील अनुभव हा धोरणातील निकषानुसार नसल्याचा आरोप उटगी यांनी केला.
त्यामुळे बँक प्रशासनाने नियुक्तीपत्रे देताना, वरिष्ठ कायदेशीर सल्लागारांचे मत घेतले. त्यांनी ही संपूर्ण भरती प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने व बेकायदा पद्धतीने झाल्याचे कळवले. भरती रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्याचा सल्लाही कायदे तज्ज्ञांनी दिला होता. पण तो अडचणीचा ठरू शकतो हे कळल्यानंतर बँकेने सोयीच्या कायदे सल्लागारांकडे मत मागितले. त्यानुसार त्यांनी, बँकिंग अनुभव नसणाऱ्यांनाही पात्र करून नियुक्त्या देण्याचा कायदेशीर सल्ला दिला गेला. अशा स्थितीत या सर्व गोंधळाची सहकार खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही उटगी यांनी केली.
...
दरेकर यांनी आरोप नाकारले
या नोकरभरतीत कोणताही गैरप्रकार झाला नाही, या प्रक्रियेवर सरकारचेही नियंत्रण असल्याने असे होणे शक्यच नसते. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, भरतीची सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचा दावाही दरेकर यांनी ‘सकाळ’कडे केला.
...