मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांबाबत हेल्पलाईन सुरू
मुंबई, ता. ९ : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाने परीक्षांबाबत महाविद्यालये व विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
मुंबईसह राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या कालावधीत विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू कराव्यात, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार परीक्षा, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र पडताळणी, दुय्यम गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र यासंदर्भातील अडचणींबाबत परीक्षा विभागाने एक मदत कक्ष सुरू केला आहे. या हेल्पलाईन कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असतील. तरी विद्यार्थ्यांनी ०२२-२६५३२०३१, ०२२ २६५३२०३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.