भूमिगत वीजवाहिन्या जळण्यात वाढ
घणसोलीमध्ये ग्राहक संख्या वाढल्याने नव्या वाहिन्यांची मागणी
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका विद्युत विभागाने सात वर्षांपूर्वी घणसोली गाव परिसरात ग्राहकांची संख्या पाहून त्या नियोजनाने भूमिगत वाहिन्या टाकल्या. परंतु, आजच्या घडीला ग्राहक संख्या पाच पटीने वाढल्याने भूमिगत वाहिन्यांवर अतिरिक्त दाब येत असल्याने त्यांच्या जळण्याच्या घटना वाढत आहेत. नियमित होणारी नागरी कामे आणि अवैध बांधकामामुळेही वीजवाहिन्यांना धोका पोहचत आहे. परिणामी, वीज खंडित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उत्तम उपाय म्हणून नवीन केबल वाहिन्या टाकाव्यात, या मागणीला जोर धरू लागला आहे.
२०१३-१४ या वर्षात पालिकेकडून पूर्ण घणसोलीतील गावठाण व गावठाण विस्तार भागात भूमिगत वाहिन्या टाकण्याचा पहिला प्रयोग झाला. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम मे. योगीराज पॉवर टेक कंपनीला दिले होते. त्या वेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे व तत्कालीन उपअभियंता संतोष मोरस्कर यांनी अनेक आव्हानांना तोंड देत भूमिगत वाहिन्या टाकून घेतल्या. गावठाण, गावठाण विस्तार परिसरात सरळ मार्ग नसल्याने वाहिन्या टाकताना प्रशासनाला त्रास सहन करावा लागला होता. त्या वेळी फक्त मोजून अंदाजे १० हजारांच्या आसपास ग्राहक संख्या होती. आता त्याच्या पाचपटीने वाढून ५० हजारांच्या आसपास ग्राहक झाले आहेत, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सात वर्षापूर्वी वीजवाहिन्या टाकताना ग्राहक संख्येचा विचार करून त्या भूमिगत केल्या होत्या. पण, घणसोली गाव परिसरात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने जुन्या वाहिन्यांना भार झेपेनासे झाले आहे.त्यामुळे विजेचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे, असे खासगी वायरमेन रवींद्र राजीवडे यांनी सांगितले. घणसोली परिसरात नियमित नागरी कामे चालू असतात. त्या वेळीही खोदकाम करताना वाहिन्या तुटतात. तुटलेल्या वाहिन्यांचे सांधे जोडले जातात. त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात त्यामध्ये पाणी जाऊन शॉर्टसर्किट होऊन वीज खंडित होते, असे रहिवासी अजय पवार यांनी सांगितले.
वीज खंडित होण्यामागील अवैध बांधकामेही कारणीभूत आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे चालू असल्याने अनेकदा यंत्र सामुग्रीद्वारे काम करताना वाहिन्या तुटतात. त्यामुळेही वीजवाहिन्या मोठ्या प्रमाणात तकलादू झाल्या आहेत. याच परिसरात रहिवासी संख्या वाढल्याने वाहिन्यांवर दाब पडत असल्याने त्या खराब होत आहेत.
डीपी बॉक्स नादुरुस्त
भूमिगत वाहिन्या करताना घराघरात वीज जोडणीसाठी डीपी बॉक्स बसविले आहेत. परंतु तेही मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. तसेच डीपी बॉक्स यंत्रणेमधील फ्यूज खराब झाल्याने नागरिकांना अनेकदा त्रासाचा सामना करावा लागतो.
कोट
दैनंदिन विद्युत खंडित होण्याच्या प्रकाराला नागरिक कंटाळले आहेत.या ठिकाणी नवीन वाहिन्या पालिकेकडून टाकणे सोयीस्कर राहील.पालिकेकडून यावर प्रामाणिक विचार करणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही.
- संदीप गलगुडे, शहर संघटक, मनसे, नवी मुंबई
नवी मुंबई पालिकेकडून भूमिगत वाहिन्या टाकून देण्याचे नागरी काम केले आहे. पुढे महावितरण विभागाने देखभाल दुरुस्ती करावी.
- प्रवीण गाडे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका