रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) : पोलिस ''रेझिंग डे''निमित्ताने माणगाव पोलिस ठाणे हद्दीतील वनवासी आश्रमशाळेत ७ जानेवारीला दहावीच्या विद्यार्थ्यांना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. मोबाईलचा वापर, महिला अत्याचारविषयक माहिती, बालगुन्हेगारी, वाहतुकीचे नियमन याबाबतची माहिती शिक्षक, विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली.
पोलिस व जनता यांनी एकजुटीने गुन्ह्यांना आळा घालावा या उद्देशाने रायगड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने माणगाव पोलिस ठाण्याच्या माध्यमातून २ ते ८ जानेवारी दरम्यान ''रेझिंग डे''चे आयोजन करण्यात आले होते. माणगाव पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि त्यांची टीम महिला उपनिरीक्षक अस्मिता पाटील, उपनिरीक्षक पोकळे, कॉन्स्टेबल शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे यांनी माणगावमधील आश्रमशाळेला भेट देऊन शस्त्र आणि वाहतुकीचे नियम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच दामिनी पथक, बडी कॉप यांची कार्यशैली काय आहे, याची सविस्तर माहिती दिली. या सप्ताहात कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्हासंबंधी माहिती देणे, पोलिस दैनंदिनी कामकाज नागरिकांसमोर मांडणे अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले होते.