घाटकोपरमध्ये गॅस गळतीत एकाचा मृत्यू
कंपनीतील केमिकल टाकीची सफाई करताना दुर्घटना
घाटकोपर/अंधेरी, ता. १० (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेतील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट, नारायण नगर येथे गॅस गळती होऊन एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. एस्के डायस्टफम अॅण्ड ऑरगॅनिक या कंपनीत ही घटना घडली. रामनिवास सरोज (३६) असे मृताचे नाव आहे; तर जखमी रुबिन सोलकर (३६) व सर्वांश सोनवणे (२५) या दोघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घाटकोपर पश्चिम येथील कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एस्के डायस्टफम अॅण्ड ऑरगॅनिक कंपनीत केमिकल साठा ठेवणाऱ्या टाकीच्या सफाईचे काम सुरू होते. यावेळी विषारी वायू निर्माण होऊन कामगारांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच जवानांनी या ठिकाणी धाव घेत कामगारांना बाहेर काढले. त्यात तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, यात रामनिवास सरोज या कामगाराचा मृत्यू झाला. या कंपनीत कापड आणि कागद ब्राइटनर्सकरिता केमिकल उत्पादन करते. दोन दिवसांपूर्वी या कंपनीच्या टाकीमध्ये सायन्युरिक क्लोराइड व मिथेनॉल हे केमिकल साठवले होते. त्यानंतर साफसफाई करताना ही दुर्घटना घडली, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास सरनाईक यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.