क्रीडा क्षेत्राला निर्बंधाचा सर्वाधिक फटका
काही प्रमाणात सवलत देण्याची मागणी
कल्याण, ता. १० (बातमीदार) : गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. प्रत्येक ठिकाणी गर्दी पाहता हे नियम जाहीर केले आहेत. मात्र याचा सर्वाधिक फटका क्रीडा क्षेत्राला बसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून खेळाडूंचे मोठे नुकसान झाल्याने या क्षेत्राकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मागील लॉकडाऊनदरम्यान क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खासगी शिक्षक व क्रीडा शिक्षक, खासगी शाळांमधील कर्मचारी वर्ग, व्यायाम शाळांमधील कर्मचारी यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. खासगी क्षेत्रातील जिम, मैदाने बंद असल्याने या व्यवसायावर आर्थिक परिणाम झाला. अनेकांनी रोजगार गमावला असून काही जण नाइलाजाने दुसऱ्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. मात्र सरकारने याची दखल न घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राचा अद्यापपर्यंत विचार केलेला नाही. सरसकट सर्व खेळ, जिम, योगा, स्वीमिंग पूल, मैदाने बंद केली आहेत. खेळाडूने वर्षभर सरावापासून दूर राहिल्यास त्याचा कामगिरीवर परिणाम होतो. सरकारने ५० टक्के क्षमतेने सामाजिक अंतर राखून आणि प्रत्यक्ष संपर्क होत नाहीत, अशा वैयक्तिक खेळांना परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोट
राज्य सरकारने मॉल, सिनेमाघर, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा व अन्य क्षेत्रांच्या ठिकाणी काही प्रमाणात सूट दिली आहे. मात्र क्रीडा क्षेत्रावर बंदी झाल्याने त्याचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिणाम होताना पाहावयास मिळत आहे.
- अविनाश ओंबासे, सचिव,
स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका.