एपीएमसीत कारवाईचा मेगा ड्राईव्ह
नवी मुंबई पालिकेकडून दक्षता पथके कार्यान्वित; दंडात्मक कारवाईचा बडगा
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः संपूर्ण एमएमआर क्षेत्राला कृषी माल व अन्नधान्य पुरवठा करणारी एपीएमसी मार्केट ही मोठी आशियातील सर्वात बाजारपेठ असून नवी मुंबई शहरातील कोविड प्रसाराच्या दृष्टीने नेहमीच जोखमीचे क्षेत्र ठरली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी एपीएमसी प्रशासनाला दिले आहेत. मार्केटमध्ये विशेष दक्षता पथके कार्यान्वित करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. आठवड्यातून एक दिवस पूर्वसूचना न देता कारवाईचा मेगा ड्राईव्ह घेण्याची सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
कोविडचा वाढता प्रसार व ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या एपीएमसी प्रशासनाने मार्केटमध्ये नियमांचे काटेकोर पालन होण्याबाबत दक्ष व्हावे या अनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एपीएमसीचे सह सचिव प्रकाश अष्टेकर व उपअभियंता मेहबूब बेपारी यांच्याशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसह माथाडी, ग्राहक हे बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला असून कोरोनाचा प्रार्दुभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एपीएमसीत पासशिवाय प्रवेश देण्यात येत नव्हता, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांचे प्रमाणही वाढवले होते. यामुळे कोरोना झालेल्या रुग्णांना तत्काळ विलगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात येत होते. एपीएमसीत गेल्या काही दिवसांत चाचण्यांचे प्रमाणही वाढवल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.
पूर्वसूचना न देता धडक
एपीएमसी प्रशासनाने मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे अशा महत्त्वाच्या सूचना दर अर्ध्या तासांनी सर्व मार्केटमध्ये माइकिंगद्वारे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मास्क व इतर कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दररोज दंडात्मक कारवाया करण्यात यावी याशिवाय कारवाईचा प्रभाव जाणवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पूर्वसूचना न देता कारवाईचा मेगा ड्राईव्ह घेण्याची सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेत येणारे एपीएमसी मार्केट बंद करता येत नाही. याठिकाणी विविध राज्यातून शेतकरी, व्यापारी माल घेऊन येतात. व्यापार्यांप्रमाणेच इतर ठिकाणाहून आलेल्या गाड्यांचे चालक, क्लिनर, मालवाहू कामगार यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. त्यामुळे कोविड प्रसाराचा मोठा धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना भर देण्याच्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यांवर कडक कारवाईचे धोरण राबवावे अशा सूचना एपीएमसी प्रशासनाला दिल्या आहेत.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाला दिले आहेत. एपीएमसीमध्ये लसीकरण सत्र सुरूच असून वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यादेखील वाढवण्यात आलेल्या आहे. व्यापाऱ्यांसह माथाडी, कामगारांना कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत.
- अशोक डक, सभापती, एपीएमसी