सुपारीचे उत्पन्न घटले

सुपारीचे उत्पन्न घटले

मुरूडमध्ये सुपारी पीक धोक्यात अस्मानी संकटामुळे ५० टक्के उत्पादन घट मुरूड, ता. १० (बातमीदार) : गेल्या दोन वर्षांत मुरूड तालुक्यातील सुपारीच्या पिकाला मोठा फटका बसला. त्याचाच परिणाम आता दिसू लागला असून यंदा गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्क्यांनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यात २०१९ मध्ये ७२५ खंडी (एक खंडी म्हणजे ४०० किलो) या पिकाचे उत्पन्न मिळाले होते; तर २०२१ मध्ये २७८ खंडीच पीक हाती आले होते. दिवसेंदिवस उत्पादनात होणारी घट हा चिंतेचा विषय झाला आहे. धार्मिक कार्यासह रंग, खाण्याच्या पानात आणि मुखवाससाठी सुपारीला मोठी मागणी असते. निसर्ग प्रकोपामुळे मुरूड तालुक्यात हे पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र ४५० हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र ३९९ हेक्टर आहे. मुरूड शहरासह आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला आदी ठिकाणी ती प्रामुख्याने पिकवली जाते. ३ जून २०२० या दिवशी निसर्ग चक्रीवादळात शेकडो एकर सुपारी क्षेत्र जमीनदोस्त झाले. त्यातून अवकाळी बरसणाऱ्या पावसामुळे पिकावर परिणाम झाला. निसर्गाच्या अवकृपेमुळे १४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती बागायतदार देतात. या वर्षी सुपारी संघाकडून १ जानेवारी २०२२ पासून सुपारी खरेदीला सुरुवात झाली असून आतापर्यंत ३० खंडी खरेदी करण्यात आली आहे. २०२१ मध्ये २७८ खंडी, २०२० मध्ये ३७५ खंडी; तर २०१९ मध्ये ७२५ खंडी सुपारी खरेदी केल्याची माहिती सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत यांनी दिली. ..... नुकसान टाळण्यासाठी संघाची मदत कोकण किनार पट्टीवरील मुरूड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना १७ सप्टेंबर १९३८ मध्ये सहकार तत्त्वावर करण्यात आली. खासगी व्यापाऱ्यांकडून कमी भावात सुपारी खरेदी करणे, वजनात फसवणूक करणे या बाबी टाळण्यासाठी सुपारी बागायतदारांना संघटित करून सुपारी संघाची स्थापना झाली. या संघाची शतकाकडे वाटचाल सुरू असून कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल होते. ...... ...म्हणून चिंता वाढली मुरूड तालुक्यात पिकवली जाणारी सुपारी श्रीवर्धन रोठा या नावाने बाजारात वाढीव दराने विकली जात असली तरी गेल्या दोन वर्षांपासून निसर्ग चक्रीवादळ व वारंवार उद्भवणाऱ्या अस्मानी संकटामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. चक्रीवादळामुळे नवीन रोपांच्या लागवडीसह जुनी सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने नगदी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. नवीन सुपारीच्या रोपांची लागवड केली तरी ७ ते ८ वर्ष उत्पन्न मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. .................... सरकारी तुटपुंजी मदत सुपारी संघाच्या सदस्यांना गत वर्षी असोली सुपारीचा दर प्रतिमण ६४०० रुपये इतका उच्चांकी जाहीर करून बागायतदारांना दिलासा दिला असला तरी उत्पन्न घटल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकारी अनुदान अत्यंत तुटपुंजे जाहीर केल्याने शेतकरी वर्गाची फसवणूक केल्याची भावना कायम आहे. .... चक्री वादळात ३०० ते ३५० सुपारीची झाडे नष्ट झाली. २०२० मध्ये ४० मण २०२१ मध्ये ३० मण तर यंदा जेमतेम २० ते २२ मण सुपारी संघाकडे विकता येणार आहे. - डॉ. वासिम पेशईमाम, सुपारी बागायतदार. .... महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना २०२१- २२ अंतर्गत जॉब कार्ड धारकांना सुपारी लागवड तसेच अन्य पिकांची लागवड शंभर टक्के अनुदानावर कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. यामध्ये तीन वर्षांमध्ये जिवंत झाडाच्या टक्केवारीनुसार अनुदान देण्यात येते. सुपारी पिकास कोकणातील वातावरण अत्यंत पोषक असून उत्पादन चांगले येते. तसेच सुपारी हे नगदी फळपीक असल्यामुळे शेतकऱ्यांना दर सुद्धा चांगला मिळतो. - विश्वनाथ आहिरे, मुरूड तालुका कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com