पनवेल-भीमाशंकर मार्गासाठी संघर्ष सुरूच ठेवणार
कर्जत जोड रस्त्यासाठी संघर्ष समितीचा निर्णय
कर्जत, ता. १० (बातमीदार) : पनवेल-भीमाशंकर या प्रस्तावित राष्ट्रीय मार्गाचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत भीमाशंकर जोडरस्ता संघर्ष समिती लढा कायम ठेवणार आहे. यासाठी स्वाक्षरी मोहीम, पायी दिंडी आदी स्वरूपाची आंदोलने करण्याचा निर्णय कशेळे येथे समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला रायगड आणि पुणे या जिल्ह्यातील समितीचे सदस्य उपस्थित होते.
कर्जत-भीमाशंकर जोडरस्ता संघर्ष समितीच्या वतीने कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते सुनील गोगटे आणि मावळमधील किसनराव गोपाळे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घेतली. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा राज्य मार्ग राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करून घेण्यासाठी काय प्रयत्न केले. त्यामुळेच त्यास तत्त्वतः मान्यता ही मिळाली, असे गोगटे यांनी सांगितले. कामास वेग येण्यासाठी जनतेची मागणी अधिक जोरकस पाहिजे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांत जागृत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले.
बैठकीत माधवराव गायकवाड यांनी सांगितले की, १९६० पासून हा रस्ता प्रस्तावित असून त्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी समितीच्या पाठीशी आहोत, असे अभिवचन दिले.
रायगड जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.