विक्रांत युद्धनौकेची
पुन्हा समुद्र चाचणी
मुंबई, ता. १० : भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका विक्रांत पुन्हा समुद्री चाचण्यांसाठी रवाना झाली आहे. या युद्धनौकेची आतापर्यंतची ही तिसरी समुद्री चाचणी आहे.
कोचीन शिपयार्डमध्ये उभारण्यात येत असलेल्या या युद्धनौकेला नुकतीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भेट देऊन पाहणी केली होती. नौकेच्या उभारणीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले होते. यापूर्वीच निवृत्त झालेल्या भारताच्या विक्रांत आणि विराट या युद्धनौका ब्रिटिश नौदलाकडून घेतल्या होत्या; तर सध्या वापरात असलेली आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका रशियाकडून घेतली आहे. आता ही चाळीस हजार टन स्वदेशी बनावटीची विक्रांत युद्धनौका भारतात उभारली जात आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही विमानवाहू युद्धनौका पहिल्या समुद्री चाचणीसाठी गेली होती. त्यावेळी तिचे इंजिन, दिशादर्शक यंत्रणा व विमानोड्डाण तसेच अन्य साध्या चाचण्या घेण्यात आल्या. ऑक्टोबरमधील दुसऱ्या चाचणीदरम्यान तिच्यावरून कठीण विमानोड्डाणे झाली, तसेच विमाने उतरविण्यात आली. त्यावेळी ही युद्धनौका दहा दिवस समुद्रात होती. भरसमुद्रात तिची कामगिरी कशी आहे हेदेखील पाहण्यात आले. ही कामगिरी समाधानकारक वाटल्याने आता समुद्राच्या वेगवेगळ्या अवस्थेत आणि वेगवेगळ्या वातावरणात ही युद्धनौका कशी काम करते, हे तपासले जाईल. त्याचप्रमाणे शत्रूच्या युद्धनौका आणि विमाने, क्षेपणास्त्रे आधीच ओळखणारी सेन्सर्सची परिणामकारकताही आजमावली जाईल.
७६ टक्के उपकरणे स्वदेशी
युद्धनौकेवरील ७६ टक्के उपकरणे स्वदेशी बनावटीची असल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेचा ती उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगितले जाते. भारतात आतापर्यंत उभारण्यात येत असलेली ही सर्वात मोठी व उभारण्यास कठीण अशा प्रकारची युद्धनौका आहे. विशेष म्हणजे कोविडच्या फैलावातही युद्धनौकेचे काम अखंडपणे सुरू आहे. चाचण्या पूर्ण झाल्यावर तिला नौदल ताफ्यात दाखल करून घेतले जाईल.