प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कामावर या
शरद पवार यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून एसटी महामंडळाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महामंडळाच्या भविष्यासाठी एसटी संपकऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. दरम्यान, कामावर रुजू झाल्यास कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही, तसेच बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत संप मिटल्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देण्यात आला. त्यानंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या मागणीबाबत न्यायालयाने समिती नेमली असून त्याचा अहवाल येण्यास अद्याप बराच वेळ आहे. समितीच्या ज्या काही शिफारशी असतील, त्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन सरकारकडून वारंवार देण्यात आले; मात्र अद्याप संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांसह विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत आज एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी पवार आणि परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले, तर कृती समितीने संपकऱ्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत मांडले.
पवार म्हणाले, की दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे राज्यातील लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ७० वर्षांपासून सर्वसामान्यांची एसटी ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. प्रवाशांचे हित जोपासणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले. त्याला एसटीदेखील अपवाद नाही, तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अत्यंत धाडसी असून त्याबद्दल त्यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारित वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.
------------------------------
कारवाई मागे घेणार ः ॲड. परब
निलंबन, बडतर्फ आणि सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ५० हजार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे कर्मचारी कामावर रुजू झाल्यास सदर नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे आश्वासन परिवहनमंत्री ॲड. परब यांनी दिले. तसेच याबाबतचे परिपत्रक काढण्याचे निर्देशही त्यांनी एसटी महामंडळाला दिले. तसेच कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांबाबत वाहतूक सुरळीत सुरू झाल्यानंतर सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही परब म्हणाले.