अवकाळीने शेतकरी चिंतातुर
वीटभट्टी मालकांचेही नुकसान
मुरबाड, ता. १० (बातमीदार) : शनिवारपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप व रविवारच्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला व कडधान्य पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी मालकांचे नुकसान झाले आहे.
मुरबाड तालुक्यात पावसाळ्यानंतर बरेच शेतकरी भेंडी, ढोबळी मिरची आदी भाजीपाला पीक घेतात. आता पुन्हा पाऊस पडल्याने या पिकावर रोग पडण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. काही शेतकऱ्यांनी कडधान्य पिके खळ्यात आणली होती; तर काही कडधान्य पिके शेतात तयार झाली होती, ती भिजल्याने नुकसान झाले आहे. मातीच्या तयार झालेल्या कच्च्या विटांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी विटा प्लास्टिक टाकून झाकून ठेवाव्या लागल्या आहेत. शिवाय पाऊस असताना विटा तयार करण्याचे काम बंद ठेवावे लागते. त्यामुळे दुहेरी नुकसान झाले आहे.
कोट
अवकाळी पाऊस पडल्याने भात पिकानंतर शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या व आता काढणीसाठी आलेल्या उडीद, मूग, चवळी आदी कडधान्याचे नुकसान झाले आहे. वाल, हरभरा पिकाचेसुद्धा नुकसान झाले.
- शंकर कोर, शेतकरी, असोळे
या वर्षी दोनतीन वेळा पाऊस पडल्याने कच्च्या विटांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विटांचा भाव सात हजार रुपये प्रतिहजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
- महेश देसले, वीटभट्टी चालक
फोटो ओळी
मुरबाड : पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक टाकून विटा झाकल्या आहेत.