पनवेल उपमहापौर पदासाठी चुरस
भाजपचे बहुमत असतानाही शेकापकडून अर्ज दाखल
पनवेल, ता. १० (प्रतिनिधी) : नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी (ता. ११) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पालिकेतील विरोधी पक्ष शेकापकडूनही अर्ज दाखल करण्यात आला आहे. पालिकेत सत्ताधारी पक्ष भाजपकडे पुरेसे बहुमत असतानाही शेकापने महापौर पदासाठी उमेदवार दिला. त्यामुळे मंगळवारी उपमहापौर पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
पालिकेच्या रिक्त असलेल्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. भाजपकडून नगरसेविका सीता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील यांच्याविरोधात शेकापकडून प्रीती म्हात्रे जॉर्ज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून नगरसेवक ॲड. नरेश ठाकूर, तर महिला आणि बालकल्याण समिती सभापती पदासाठी भाजपच्या खारघरमधील नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर आणि महिला व बालकल्याण समिती सभापती निवडणुकीसोबतच स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती पदाचीही निवडणूक होणार असल्याने भाजपकडून स्थायी समिती सभापती पदासाठी अ प्रभागासाठी नगरसेविका संजना कदम, ब प्रभागासाठी नगरसेविका प्रमिला पाटील, क प्रभागासाठी नगरसेविका अरुणा भगत आणि ड प्रभागासाठी नगरसेविका ॲड. वृषाली वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शेकापकडून ब प्रभाग समिती सभापती पदासाठी नगरसेविका प्रिया भोईर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
.....
पनवेल पालिकेत महिलाराज
पनवेल पालिकेच्या महापौरपदावर भाजपच्या डॉ. कविता चौतमोल या महिला नगरसेविका विराजमान आहेत. पालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापती पदाच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसोबतच उपमहापौर पदासाठीही भाजपकडून महिला उमेदवार देण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षाकडूनही महिला उमेदवार देण्यात आल्याने निवडणुकीच्या निकालानंतर पनवेल पालिकेवर महिला राज स्थापित होणार आहे.
.......
मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास
महापौरपद खुल्या वर्गातील महिला नगरसेविकेसाठी आरक्षित असतानाही डॉ. चौतमोल यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. यामुळे मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी उपमहापौर पदावरून राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर मराठा समाजाच्या नगरसेवकाची वर्णी लागावी, यासाठी खारघरमधील नगरसेविका नेत्रा पाटील आणि संजना कदम यांनी मागणी केली होती. त्यानंतर उपमहापौर पदासाठी ॲड. ठाकूर यांना संधी देण्यात आल्याने मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे.