उद्यानांची देखभाल ४० टक्के कमी खर्चात
पालिका स्थायी समितीत पडसाद उमटण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उद्यान, मैदाने, चौक, वाहतूक बेटांची देखभाल तब्बल ४० टक्के कमी दराने होणार आहे. मुंबईतील २४ पैकी सहा प्रभागांत ४० टक्के आणि चार प्रभागांत ३९ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवली आहे. उर्वरित प्रभागांमध्ये ३५ ते ३८ टक्के कमी दराने कामे होणार आहेत. हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला असून, त्याचे तीव्र पडसाद उमटणार आहेत. वर्षभराच्या या कामासाठी महापालिका १८ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेने उद्यान, मैदाने, वाहतूक बेटांच्या देखभालीसाठी प्रत्येक प्रभागानुसार निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी पालिकेने अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, पालिकेच्या अंदाजापेक्षा तब्बल ३५ ते ४० टक्के कमी दराने कामे करण्याची तयारी कंत्राटदारांनी दाखवली आहे. यापूर्वी रस्ते दुरुस्तीबरोबर उद्यान, मैदानांची डागडुजी आणि सुशोभीकरणासाठी महापालिकेने निविदांमध्ये कंत्राटदारांनी ४० टक्क्यापर्यंत कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यावेळी कमी दराने होणाऱ्या कामाच्या दर्जावर शंका उपस्थित करत प्रशासनानेच या निविदा नाकारल्या होत्या. मात्र, आता उद्यान, मैदानाच्या देखभालीसाठी ४० टक्के कमी दराने पालिका काम देणार आहे.
----
१५ दिवसांत कारवाई
पालिकेचे उद्यान विद्या सहाय्यक आणि कनिष्ठ वृक्ष अधिकारी दर सात दिवसांनी पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी पाहणी करायची आहे. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने या प्रस्तावात नमूद केली आहे.
कमी खर्चात देखभाल होणार विभाग
जी उत्तर (४०.५० टक्के), के पूर्व (४१.१३ टक्के), के पश्चिम (४०.०१ टक्के), पी दक्षिण (४०.५० टक्के), एम पश्चिम (४०.०१ टक्के), आर दक्षिण (४०.०१ टक्के), एफ उत्तर (३९.७० टक्के), पी उत्तर (३९.८० टक्के), एल (३९.८०), एच पूर्व (३९.९९ टक्के).