महामुंबईत थंडीचा कडाका
माथेरानचा पारा १० अंशांवर; मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे परिणाम महामुंबईतही जाणवू लागले असून सोमवारी (ता. १०) पारा घसरल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. आज मुंबईतील किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या मोसमातील सर्वात किमान तापमानाची नोंद सोमवारी झाल्याने पहाटे चांगलीच हुडहुडी जाणवली. रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान परिसरात सर्वाधिक कमी १० अंशांची नोंद झाली.
रविवारी रात्रीपासूनच ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडसह सर्वत्र बोचरी थंडी पडली होती. ठाण्यातील पाराही १६ अंशांपर्यंत खाली आला होता. रायगड आणि पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले गेले. आज सांताक्रूझमध्ये १३.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यात सातत्याने बर्फवृष्टीही होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने गार वारा सुटले आहेत. परिणामी महाराष्ट्र आणि मुंबईतील किमान तापमान अधिक घसरले आहे. त्यामुळे महामुंबईतही थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याने मुंबईकरांना गारवा अनुभवता येणार आहे.
मुंबईतील कमाल तापमानातही घसरण झाली. सांताक्रूझमध्ये २५.१ तर कुलाब्यात २५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. थंडीच्या मोसमातील कमी कमाल तापमानाची नोंद सोमवारी झाली. त्यामुळे भर दुपारीही हवेत गारवा होता. काही दिवस उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेले मुंबईकर काहीसे सुखावले.
तीन ते चार दिवस थंडीचा जोर
गेल्या २४ तासांत मुंबईतील पारा साधारण पाच अंशाने घसरला असल्याची माहिती हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी दिली. परिणामी मुंबईकरांना मोसमातील सर्वात कडक थंडीचा अनुभव घेता आला. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र थंडीने कुडकुडला
अचानक थंडी वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही थंडीने कुडकुडला आहे. सोमवारी (ता. १०) निफाडमधील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील राज्याचे नीचांकी ६.१ तापमान नोंदले गेले. उद्या (ता. ११) उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खानदेशात रविवारी (ता. ९) रात्री पारा घसरून सात अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी किमान तापमानात तीन ते सहा अंशांची घट झाल्याने अचानक गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.