रस्ते दुरुस्तीच्या मंजुरीनंतर
दर्जा तपासणीसाठी निविदा
महापालिकेचे वरातीमागून घोडे; ४० कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार २०० कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळून कार्याध्येशही देण्यात आले आहे. त्यानंतर महापालिकेने या कामावर देखरेख ठेवण्याबरोबर कामाचा दर्जा तपासण्यासाठी ऑडीटर नेमण्याचा निर्णय घेत त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी महापालिका ४० कोटी रुपये खर्च करणार आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका ‘क्यालिटी मॉनिटरींग एजन्सी’ची नियुक्ती करणार आहे. या संस्थेमार्फत दुरुस्तीसाठी कच्चा माल येणाऱ्या ठिकाणापासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी होणाऱ्या कामावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. कामाच्या दर्जा राखण्याबरोबर ठरवून दिलेल्या तपशीलानुसार काम होत आहे का नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी कंपनीची राहाणार आहे. यात काही कसूर झाल्यास कंपनीला जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच, या एजन्सीने सुचवलेल्या दुरुस्तीही संबंधित कंत्राटदाराला करणे बंधनकारक आहे. प्रत्येक झोननुसार ऑडीटर नेमण्यात येणार आहेत.
महापालिकेने आता सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात रस्ते दुरुस्तीच्या कामाचे कार्यार्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतरही सल्लागारांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या विलंबावर प्रश्न निर्माण केला जात आहे.
दरम्यान, कार्यार्देश दिलेले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत या एजन्सीची नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे पालिकेचे रस्ते अभियंता राजेंद्र तळकर यांनी सांगितले.
-----
निविदेवर भाजपला संशय
भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी रस्ते दुरुस्तीच्या प्रस्तांवावर स्थायी समितीत चर्चा करताना ऑडीटरच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. आता कामे मंजूर झाल्यानंतर ऑडीटरची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली. या निविदा प्रक्रियेवर रस्ते दुरुस्तीचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटाचा प्रभाव पडू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे शिरसाट यांनी नमूद केले.