अस्वाली धरणाला धोका नाही
अभियंता रवींद्र कोती यांची माहिती
बोर्डी, ता. ११ (बातमीदार) : जलसंधारण विभागाने अस्वाली धरणाच्या केलेल्या ताप्तुरत्या दुरुस्ती कामामुळे पाणी साठवण्याच्या क्षमतेइतके भरले आहे; मात्र दुरुस्ती कामासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरी मिळताच आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. सध्या धरणाला कोणताही धोका नाही, अशी माहिती जलसंधारण विभागाचे अभियंता रवींद्र कोती यांनी दिली.
२०१९ मध्ये अस्वाली धरणाची पाणी निचरा करणारी मुख्य विमोचक (हेड रेग्युलेटर) यंत्रणा बसवण्यात आलेली विहीर कोसळली होती. त्यामुळे धरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यात पाणीसाठा करण्यात आला नव्हता. २०२० मध्ये या विहिरीची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर धरणात पावसाळ्यात क्षमतेप्रमाणे पाणीसाठा करण्यात आला होता; मात्र पुढील काळातील धोका लक्षात घेता मुख्य विमोचक विहिरीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यासाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे अभियंता रवींद्र कोती यांनी सांगितले.
या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के, तसेच नुकतेच केळवे येथील धरणाला पडलेले भगडाद या पार्श्वभूमीवर अस्वाली धरणाचे काम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
बोर्डी : अस्वाली धरणातील पाणीसाठा.