ताडीच्या अतिसेवनाने डोंबिवलीत दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः ताडीचे अतिसेवन केल्याने दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील कोपर गावात घडली. सचिन पाडमुख (२२) व स्वप्नील चोळके (३०) अशी मृत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात ताडीविक्रेता रवी बथनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून काम करत होता. दोन महिन्यांपासून तो सुट्टीवर होता.
सचिन पाडमुख हा कैलास नगर येथील मुक्ताई निवासमध्ये राहण्यास होता. तो एका कंपनीत काम करीत होता. तर स्वप्निल हा कोपर गावात राहण्यास होता. सोमवारी (ता. १०) रात्री हे दोघे इतर दोन मित्रांसह कोपर परिसरातच असणाऱ्या ताडी केंद्रावर गेले होते. रात्री ९ च्या सुमारास ते घरी परतत असताना त्यांना रस्त्यातच त्रास जाणवू लागला. मित्रांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले; मात्र त्यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी राहुल पाडमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ताडीविक्रेता रवी बथनी याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तो फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांच्या हृदयावर ताण येऊन या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली. कोपर परिसरात सुरु असलेले ताडी विक्री केंद्र कोणाच्या आर्शिवादाने सुरु होते. या केंद्रास परवानगी होती का? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे लक्ष गेले नाही का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.