वसई, विरारमध्ये लवकरच इलेक्ट्रिक बसेस
महापालिका करणार २१ कोटी रुपयांचा खर्च
विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस येणार आहेत. यासाठी पालिकेने निविदा काढली होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून एका कंपनीला ठेका देण्यात आला आहे. लवकरच प्रायोगिक तत्त्वावर १५ बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहनाबाबतचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी सरकारच्या सर्व विभागांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेच्या परिवहन विभागाकडे लवकरच १५ इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून यासाठी २० कोटी ८६ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. नवीन बसेस खरेदी केल्यानंतर परिवहन ठेकेदाराला वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासाठी चार चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत; मात्र या केंद्रांवर फक्त पालिकेच्याच बसेस चार्जिंग करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही दिवसांत वसई-विरारकरांना इलेक्ट्रिक बसेसमुळे मोकळा श्वास घेता येणार आहे.
वसई-विरारमधील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम या योजनेंतर्गत पालिकेला वायुप्रदूषण नियंत्रणासाठी एकूण ३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पालिकेने वायुप्रदूषण रोखण्यासाठी मियावाकी वने तयार करणे, एअर स्टेशन बनवण्यासह इतर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
चौकट
दरम्यान, काही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसची चाचणी नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत पालिकेने घेतली होती; मात्र काही बसेसची बॅटरी खालच्या बाजूला असल्याने त्यास नकार दिला होता. त्यानंतर पालिकेने बसच्या वर बॅटरी असलेल्या बस निश्चित करत एका कंपनीच्या बसेस मागवण्याचे निश्चित केले आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
कोट
लवकरच वसई-विरारकरांना प्रदूषणविरहित अशी बससेवा मिळणार आहे. पुढील काळात परिवहन ठेकेदारामार्फत पारंपरिक इंधनाऐवजी सीएनजी बसेस रस्त्यावर येतील. इतर सर्वच वाहने इलेक्ट्रिक चालवण्यावर आम्ही भर देणार आहोत.
- प्रीतेश पाटील, परिवहन सभापती, वसई-विरार महापालिका