उद्याने बंद असल्याने नाराजी
ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची गैरसोय
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः मंगळवारपासून उद्याने बंद करण्यात आल्याने पहाटे चालायाला जाणाऱ्या आणि खुल्या व्यायामशाळेत नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांची गैरसोय होत आहे.
काही नागरिकांनी उद्यान बंद असल्याने घरी परतणे पसंद केले तर काहींनी रस्त्यावर फेरफटका मारून घर गाठले. सकाळी १० वाजेपर्यंत तरी उद्याने उघडी ठेवा, अशी मागणी या नागरिकांकडून होत आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि महिला आरोग्याची काळजी घेण्यासाठी दररोज सकाळी उद्यानांत चालतात आणि थोडा व्यायाम करतात. पंचोलीय उद्यान, गोपीनाथ मुंडे उद्यान आणि प्रमोद महाजन उद्यान बंद असल्याने कांदिवली आणि बोरिवलीकर नाराज झाले आहेत. उद्यानाच्या बाहेर सकाळी ६ ते ९ या वेळेत तुळशी, आवळा, जिरे, कोकम आणि कारल्याचा रस विकणाऱ्या विक्रेत्यांवर ग्राहक नसल्याने संक्रांत आली आहे. कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढल्याने राज्य शासनाने उद्याने, धार्मिक स्थळे, तरण तलाव आणि इतर गोष्टींवर निर्बंध लावले आहेत.
...
खाऊ गल्ली, भाजी मार्केट, चारकोप मार्केट आदी ठिकाणी दिवसभर गर्दी असते. सकाळी उद्यानांत ज्येष्ठ नागरिक आणि महिला येतात. उद्यानांत चालून आणि व्यायाम झाल्यानंतर दिवसभर घराबाहेर पडत नाहीत. आमचे आरोग्य सुरक्षित राहाते. शासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा.
- आदिनाथ हेंद्रे, ज्येष्ठ नागरिक
राजकीय सभा, उद्घाटने असे गर्दीचे व्यवहार सुरू आहेत. तेव्हा करोना वाढत नाही का? आम्ही उद्यानातून घरी गेल्यानंतर घराबाहेर पडत नाही. शासनाने १० वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवावी.
- वैशाली वंडेकर, नियमित उद्यानात येणाऱ्या रहिवासी
...