वसईत कचरागाडीला `दे धक्का`, व्हायरल व्हिडीओमुळे संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत कचरागाडीला `दे धक्का`, व्हायरल व्हिडीओमुळे संताप
वसईत कचरागाडीला `दे धक्का`, व्हायरल व्हिडीओमुळे संताप

वसईत कचरागाडीला `दे धक्का`, व्हायरल व्हिडीओमुळे संताप

sakal_logo
By
वसईत कचरागाडीला ‘दे धक्का’ व्हायरल व्हिडीओने संताप; देखभाल-दुरुस्तीचा प्रश्नही ऐरणीवर वसई, ता. ११ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यातील कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातच शहरातील एका कचरा गाडीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. कचरागाडी नादुरुस्त झाल्याने दुसऱ्या कचरागाडीने तिला टोईंग करून नेले जात असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते. ही नामी शक्कल कोणी लढवली याची माहिती मिळू शकली नसली, तरी शहरातील कचरा गाड्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न या प्रकाराने पुन्हा चर्चेत आला आहे. पालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने दाखल होत असली, तरी जुनाट वाहने कायम रस्त्यावर धावत आहेत. ती कशीही दामटवली जातात. त्यामुळे भररस्त्यात बंद पडून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असल्याने या वाहनांना सक्तीची निवृत्ती देण्याची मागणीही शहरातून जोर धरत आहे. वसई- विरार- नालासोपारा या पालिका हद्दीचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने मूलभूत समस्याही उद्‌भवतात. त्यापैकीच कचऱ्याची समस्या शहरात कायम चर्चेत असते. शहरातून दररोज सुमारे ७०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी पालिकेने १० कॉम्पॅक्टर व ५० टिपर वाहने तसेच गटारांचा गाळ काढण्यासाठी ३ व्हॅक्युम टँकर; तर मैला स्वच्छतेसाठी ५ ट्रॅक्टर व ५ टँकर, ५० बीन टिपर लिफ्टर वाहने व सफाईसाठी यांत्रिक झाडू असणारी वाहने नव्याने खरेदी केली आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याचबरोबर जुनी १०० मोठी; तर १५० छोटी वाहनेदेखील पालिकेच्या ताफ्यात आहेत; मात्र कंत्राटदारांकडून या वाहनांची देखभाल-दुरुस्ती ही अधिकृत सेंटरमध्ये होत नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील बंद पडलेल्या कचरा वाहनाला दुसऱ्या कचरा वाहनाच्या साह्याने खेचून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या विषयाची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. हा प्रकार नालासोपारा भागात घडल्याचे समजते. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पालिकेतर्फे घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते, परंतु कचरा उचलण्यात सातत्य नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आणि त्यातून दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतो. वसई-विरार शहरात दररोज ओला व सुका कचरा गोळा करून कचराभूमीवर जमा केला जातो. याकरिता पालिका प्रशासनाने २० कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. गटार सफाई, कचरा संकलन करणे, रस्ते व सार्वजनिक सफाई आदी कामे याअंतर्गत येत आहेत, परंतु कचरा उचलणारी वाहने अनेकदा बंद पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. नवीन वाहनांमध्येही बिघाड पालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी नवीन वाहनांची खरेदी केली आहे. ही वाहने मोठ्या संख्येने रस्त्यांवर धावत असली तरी त्यातही बिघाड उद्‍भवत आहेत. त्यात जुनी वाहनेही नादुरुस्त होत आहेत. २०१९-२० मध्ये पालिकेने २०० कोटींचा खर्च कचरा वाहने खरेदीसाठी केला होता. २०२१ मध्येही पालिकेने नवीन वाहने खरेदी, देखभाल मिळून कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे, परंतु वाहनांमध्ये बिघाड होत असल्याने हा खर्च जातो कुठे, असा प्रश्‍न करदात्या नागरिकांकडून विचारला जात आहे. आयुक्तांच्या नोटिशीला केराची टोपली शहरात कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी कामात हयगय केल्याप्रकरणी डिसेंबरअखेरीस कचरा कंत्राटदारांना नोटिसादेखील बजावल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींच्या संख्येनुसार टक्केवारीप्रमाणे दंड वसूल करण्याचा निर्णय त्या वेळी घेतला होता. यानंतरदेखील कचऱ्याच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. प्रशासनाची असमर्थता कचराभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर विल्हेवाटीसाठी शास्त्रोक्त पद्धतीचा वापर होत नसल्याने पर्यावरण विभाग, हरित लवादाने पालिकेला फैलावरदेखील घेतले. प्रदूषण वाढत असल्याने योग्य ती काळजी घ्यावी म्हणून पालिकेने उपाययोजनांची यादी तयार केली आहे, परंतु काही ठेकेदारांचे दुर्लक्ष, पालिकेला आलेले अपयश पाहता प्रत्यक्षात कचरा उचलण्यास व त्याची विल्हेवाट लावण्यास प्रशासन असमर्थ ठरत आहे. शहरात कचऱ्याच्या गाडीला दुसऱ्या वाहनाने टोईंग केले असल्याचा प्रकार कुठे घडला याचा शोध घेतला जाईल. हे कचरा वाहन नादुरुस्त झाले असल्यानेच टोईंग केले असेल. वाहनांच्या दुरुस्तीबाबतही कळवले जाईल. - नीलेश जाधव, सहाय्यता आयुक्त, स्वच्छता विभाग लोकप्रतिनिधी असताना अशा छोट्या-मोठ्या विषयांवर तातडीने चर्चा होऊन तोडगा काढला जायचा; मात्र प्रशासकीय राजवटीत ताळमेळ उरला नाही. एक वाहन दुसऱ्या कचरा वाहनाला टोईंग करत असेल तर हे भयावह आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. - रूपेश जाधव, माजी महापौर, वसई-विरार वाहनात कचरा जमा केला तरी नेताना खाली पडतो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. अनेकदा कचरा उचलला जात नाही. अशा परिस्थितीत डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पालिकेने याबाबत सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. - विपुल परमार, वसई.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top