१५ गुन्हे करणारा चोरटा अटकेत
९ लखांचा मुद्देमाल जप्त
नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून फरार होणारा, वाहन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटक आरोपीकडून आठ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, वाहन जप्त केले आहे. त्याने विरार पोलिस ठाण्यातील १५ गुन्ह्याची कबुली दिली आहे. वसई न्यायालयाने त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अजय किरण शाह (वय २२) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव असून तो विरार पूर्व बरफपाडा येथील रहिवासी आहे. १२ डिसेंबर रोजी विरार पूर्व गुरुदत्त नगर येथे पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील आठ तोळ्याची सोन्याची साखळी चोरी करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आरोपीला अटक केली. या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने विरार पोलिस ठाणे हद्दीतील १५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून या गुन्ह्यांतील पाच लाख २० हजार रुपये किमतीच्या आठ सोन्याच्या चेन व मंगळसूत्र, तीन लाख ६० हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती विराराचे सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली आहे.
चौकट
गरोदर पत्नीमुळे पोलिसांच्या जाळ्यात
विरारमध्ये वाढते गुन्हे आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता एकच आरोपी हा अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण गुन्हेगार हा मोबाईल वापरत नव्हता, आपला पत्ता वारंवार बदलत असल्याने आरोपीला शोधणे पोलिसांपुढे एक आव्हान होते. आरोपीची पत्नी गरोदर असून ती प्रसुतीसाठी दवाखान्यात दाखल होऊ शकते, याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोपी आणि त्याची माहिती देऊन गरोदर महिला रुग्णालयात दाखल झाली तर तत्काळ कळवा, असे सांगितले होते. सातपाटी परिसरातील रुग्णालयात गरोदर पत्नी दाखल झाली असताना तिला भेटण्यासाठी आरोपी येताच विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.